Monday, November 19, 2007

उगीचच : एक सुरुवात

मातृभाषेत लिहायची माझी इच्छा दांड्गी, पण इतके दिवस त्याला प्रयत्नांची जोड़ नव्हती. ब्लॉगरची इंग्रजीतून मराठीत भाषांतर करणारी सुविधा सुद्धा अत्यंत वेळखाऊ वाटली. खरं म्हणजे मी जेव्हा माझा जुना ब्लॉग सुरु केला तेव्हा माझा हेतू मराठीत लिहायचाच होता परंतू येन केन प्रकारेन ते कधी झालेच नाही आणि तो ब्लॉग इंग्रजी पुरताच मर्यादित राहिला. माझी बोली भाषा जरी अस्खलित असली (पुणेरी माज म्हणतात तो हाच!) तरी मराठीत लिहायची वेळ आली की माझे धाबे दणाणायचे. कधी नेमका अर्थ असलेला शब्दच आठवणार नाही तर कधी पूर्ण वाक्य सुद्धा लिहिता येणार नाही. इंग्रजीतून जितक्या सहजपणे विचार मांडता येतात तसं मराठीत होत नाही. शुद्धलेखनाची बोंब तर त्याहूनही वेगळी! ह्या गोष्टीचा मला मनापासून राग होता.

काही दिवसांनी परत एकदा मराठीत लिहावंसं वाटलं आणि म्हणून हया नवीन ब्लॉगचे प्रयोजन. काय लिहीन किती लिहीन काही सांगता येत नाही पण निदान हा ब्लॉग एक placeholder राहिल कधी वाटलं तर येउन बडबड करायला. पाहूया कसं जमतय ते. तोपर्यंत निदान ही एक सुरुवात ....

No comments: